सण व उत्सव

गावामध्ये सर्व जाती धर्माचे सण व उत्सव मोठया उत्साहात सर्व एकत्र येऊन साजरे केले जातात.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन याबरोबरच ग्रामपंचायत स्थापना दिन हा ‘ग्रामदिन’ म्हणून विविध उपक्रमांद्वारे मोठया उत्सवात साजरा केला जातो.

०९ जानेवारी ग्रामदिन –

ग्रामपंचायत स्थापना ०९ जानेवारी १९५२ रोजी झाल्यानंतर सन २०१६ पासून ग्रामसभेने ०९ जानेवारी हा ग्रामदिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले व हा दिवस मिनी मॅरेथॉन स्पर्धा, कब्बडी स्पर्धा, महिलांच्या विविध स्पर्धा, रक्तदान शिबीर, स्नेहभोजन, विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटने या कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

या दिवशी प्रमुख पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थित विशेष ग्रामसभेचे आयोजन करून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

प्रजासत्ताक (२६ जानेवारी), स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) –

सर्व शाळा, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजावंदन करून साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. यानंतर विध्यार्थ्यांना खाऊ वाटप केले जाते.

महाराष्ट्र दिन –

‘ १ मे ‘ हा महाराष्ट्र दिन शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत येथे ध्वजावंदन करून विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जातो.

गुढीपाडवा –

मराठी नव वर्षाचे स्वागत चैत्र शुध्द प्रतिपदेला गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गावातील सर्व देव-देवतांची पुजा केली जाते. या दिवशी सर्व ग्रामस्थ, कारभारी मंडळी एकत्र येऊन गावातील वर्षभराचे कार्यक्रम (यात्रा उत्सव) ची रूपरेषा यातील बैठक घेऊन निर्णय घेतात.

परंपरेप्रमाणे रात्री करमणुकीसाठी ‘रामलीला’ सादर केले जाते.

अखंड हरीनाम सप्ताह (जांबूत) –

श्रावण वैद्य प्रतिपदेला अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवात होते व श्रावण वैद्य अष्टमी गोपालकाला या दिवशी सांगता होते. या काळात अखंड विणा वादन, काकडा, प्रवचने, हरिपाठ, कीर्तने, भजन इत्यादी कार्यक्रम उत्साहात होतात. यासाठी ३६ वर्षाची परंपरा आहे.

शरदवाडी येथील अखंड हरीनाम सप्ताह, श्रीराम नवमी चैत्र शुध्द नवमीला श्रीराम जन्म सोहळ्याने सुरुवात होते व चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती सोहळ्याने होते, या काळात विणा वादन, काकडा, हरिपाठ, प्रवचने व कीर्तने, भजन होतात.

यात्रा उत्सव – ग्रामदैवत खंडेराया यात्रा उत्सव :

वैशाख शुद्ध तृतीय (अक्षय तृतीय) या दिवशी असते. यात्रेसाठी सकाळी श्री खंडेरायाचा अभिषेक, पालखी मिरवणूक, बैलगाडा शर्यती, कुस्तीचा आराखडा, संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

माता मळगंगा यात्रा उत्सव :

चैत्र वैद्य नवमी या मुहूर्तावर साजरी केली जाती. या दिवशी देवीचा अभिषेक, पालखी मिरवणूक व देवीची गाणी, चोळी पातळ, संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

कामलजाई देवी यात्रा उत्सव :

वैशाख शुद्ध सप्तमी या मुहूर्तावर मोठया उत्साहात देवीला अभिषेक, चोळी पातळ, देवीची गाणी, संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

गणेशोत्सव व नवरात्र उत्सव :

गावातील विविध मंडळे गणेशोत्सव व नवरात्र उत्सव विविध कार्यक्रमांसह मोठया उत्साहात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे वटपौर्णिमा - जेष्ठ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा – आषाढ पौर्णिमा, बैलपोळा – श्रावणी अमावस्या या दिवशी बैलांना नैव्यद्य दाखवून सजवले जाते व गावातून बैलांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.

दसरा :

अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी या दिवशी परंपरेप्रमाणे साजरे केले जाते. संध्याकाळी रावणदहन, सिमोलंघन केले जाते.

दिवाळी :

धनत्रयोदशी पासून भाऊबीज पर्यंत हा सण परंपरेप्रमाणे साजरे केले जाते.

शिवजयंती १९ फेब्रूवारी :

शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून पोवाडे सादर केले जातात.

डॉ. आंबेडकर जयंती १४ एप्रिल :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजन, मिरवणूक काढून मोठया उत्साहात साजरी केली जाते.

तसेच जैनबांधव महावीर जयंती व मुस्लिम बांधव रमजान ईद, बकरी ईद, ईद-ए-मिलाद हे सण तिथीप्रमाणे मोठया उत्साहात साजरे करतात.